बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२६
मॉर्निंग मंत्र
मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६
मॉर्निंग मंत्रा
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६
मी नाही म्हणाले तर? भाग 7
मी नाही म्हणाले तर? भाग 7
अनघा सुशिक्षित आणि आजच्या युगाची स्त्री.
पण असं असूनही अनघाला लहानपणापासून इतरांची मर्जी राखायची सवय लागली होती. लग्न आधीची ही सवय लग्नानंतरही कायम राहिली. कारण व्हायचं काय इतरांची मन राखत असल्यामुळे कुठे ना कुठेतरी तिचं कौतुक व्हायचं, तिचं उदाहरण इतरांना सांगितलं जायचं. आणि मग अनघाच्या अंगावर नकळत मुठभर मास चढायचं.
पण इतरांची इच्छा पूर्ण करताना तिचा जीव मेटाकुटीला यायचा. अशावेळी ती स्वतःला नंतर केल्या जाणाऱ्या कौतुकापोटी रेटत राहायची.
तिला सतत वाटायचं की आपल्यामुळे आजूबाजूच्या कोणाचेही मन दुखावले जाऊ नये. शेजारी पाजारी, सासर-माहेर, मित्र-मंडळी... प्रत्येकाला काय वाटेल, याचा विचार करून ती नेहमी स्वतःचे निर्णय घेत असे.
कुठेतरी बाहेर जायचे असेल, पण मैत्रिणींनी नकार दिला तर ती स्वतःचा प्लॅन रद्द करायची. कोणाला तिचे एखादे वागणे खटकले तर ती रात्री झोपेतही त्याचाच विचार करत राहायची. तिला नेहमी वाटायचे, ' आजूबाजूला सगळेजण मला साधी आणि समजूतदार म्हणत आहेत. आणि मला आयुष्यभर माझी तीच इमेज राखायची आहे. जर मी असं केलं नाही तर माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ उरणार नाही.’
हळूहळू तिच्या या स्वभावाचा फायदा घेत लोकांनी तिला एका चौकटीत बसवून टाकले होते.
पण आता त्या चौकटीत अनघाचा श्वास गुदमरू लागला होता. कारण तिथे तिला स्वतःचे मत स्पष्टपणे मांडायची परवानगी नव्हती. आता ती लोकांच्या तालावर नाचणारी एक बाहुली झाली होती.
एक दिवस, तिच्या एका खूप जवळच्या व्यक्तीने तिच्या एका लहानशा निर्णयावर जाहीरपणे नाखुशी दाखवली आणि तिला टोमणा मारला, "तू आता खूप बदललीस, तुझा हा स्वार्थीपणा मला अजिबात आवडला नाही."
त्या एका वाक्याने अनघाला प्रचंड धक्का बसला. ती आयुष्यभर लोकांच्या पसंतीसाठी झटली होती, आणि आज एका क्षणात ते लोक नाराज झाले! तिला सुरुवातीला खूप अपराधी वाटले. तिने विचार केला, 'मी खरंच वाईट वागले का?'
पण त्या रात्री, आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे पाहिले. तिला जाणवले की गेल्या वीस वर्षांत तिने स्वतःसाठी कधी एक श्वासही घेतला नव्हता. तिने लोकांची मंजुरी मिळवली खरी, पण त्या बदल्यात तिने स्वतःची शांतता, तिची स्वप्ने आणि तिचे मन पूर्णपणे गमावून टाकले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाने एक मोठा निर्णय घेतला. तिने स्वतःला विचारले, 'जर मी लोकांच्या मर्जीप्रमाणे वागणे आजच थांबवले, तर काय होईल?'
सुरुवातीला तिला त्रास झाला. पण तिने लोकांच्या नाके मुरडण्याकडे, तिच्यावर होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. जेव्हा कोणी तिला मनाविरुद्ध काही करायला सांगायचे, तेव्हा ती शांतपणे 'नाही' म्हणायला शिकली. तिने स्पष्टीकरण देणं सोडून दिलं.
अर्थातच, यामुळे सुरुवातीला अनेक जण तिच्यावर रुसले, रागवले. पण अनघा आता घाबरली नाही.
हळूहळू त्या टीकेच्या आणि रोषाच्या गोंधळातून तिला एक गोष्ट स्पष्ट जाणवू लागली— तिच्या मनाची शांतता ही कोणाच्याही कौतुकापेक्षा किंवा मंजुरीपेक्षा कैक पटीने जास्त मोलाची आहे!
या गोष्टीवरून आपण काय शिकतो?
लोकांच्या आवडीनिवडींपेक्षा तुमच्या मनाची शांतता लाख मोलाची असते!
आपल्याला लहानपणापासून असंच शिकवलं जातं की, सगळे आपल्याला 'चांगलं' म्हणायला हवेत.
कळत नकळत लोकांचं मत आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं होत जातं. सर्वांना खूश ठेवणं, कोणाला राग येऊ न देणं यातच आपण आयुष्य घालवतो. आतमध्ये खूप रडावंसं वाटत असतानाही चेहऱ्यावर खोटं हसू आणतो. आतून स्पष्ट 'नाही' म्हणायचं असतं, तरी तोंडातून सहज 'हो' म्हणून मोकळे होतो.
पण खरं काय आहे माहीत आहे का? तुमच्या मनाची शांतता ही लोकांच्या टाळ्यांपेक्षा आणि कौतुकापेक्षा कैक पटीने जास्त महत्त्वाची आहे.
इतरांना खूश करण्याच्या या नादात आपण स्वतःशीच प्रतारणा करतो. आपण जणू दुसऱ्यांच्या नाटकातील असे कलाकार बनतो, ज्यांचे डॉयलॉग आपण कधी लिहिलेलेच नसतात. या सगळ्या दगदगीत आपला स्वतःचा मूळ आवाज कुठे तरी हरवून जातो, श्वास गुदमरल्यासारखा होतो आणि आयुष्य रिकामं वाटू लागतं.
जे लोक तुमची ऊर्जा सतत शोषून घेतात, त्यांना खूश करून शेवटी काय हातात पडतं? कोणतंही बक्षीस नाही, तर स्वतःलाच दिलेली ती एक शिक्षा असते!
मनाची शांतता टिकवण्यासाठी कोणाच्या टाळ्यांची किंवा शाबासकीची गरज नसते. ही शांतता जरी आतली असली, तरी ती खूप मजबूत असते. ती रात्री तुम्हाला डोळे मिटून शांत झोप देते, आरशात स्वतःच्या डोळ्यात हसून पाहण्याची ताकद देते. हे स्वातंत्र्य कोणतीही लोकांची वाहवा तुम्हाला कधीच देऊ शकत नाही.
त्यामुळे, काही लोकांना तुमच्याबद्दल गैरसमज होणार असेल तर होऊ द्या, चार चौघांना टीका करू द्या. प्रत्येकाला पटवून देत बसण्याची गरज नाही. जर कोणाची पसंती मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच गमवावं लागत असेल, तर त्या पसंतीला काहीच अर्थ नाही.
लोकांच्या कौतुकासाठी तुमचा जन्म झालेला नाही—तुम्ही मोकळा श्वास घेण्यासाठी जन्म घेतला आहात. त्यामुळे लोकांच्या कौतुकाच्या नजरा नाही मिळाल्या तरी चालतील, पण तुमच्या मनाची शांतता कधीही गमावू नका.
थोडंसं स्वतःशी बोलूया ...
Self Reflection Questions…
१. "आजपर्यंतच्या आयुष्यात लोकांकडून 'साधी आणि समजूतदार' असण्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या कोणत्या इच्छांचा आणि आनंदाचा बळी दिला आहे?"
२. "जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणाला 'नाही' म्हणाल, तेव्हा लोकांच्या रोषापेक्षा स्वतःला मिळणाऱ्या मोकळ्या श्वासाची किंमत तुम्हाला मोठी वाटेल का?"
३. "तुमच्या मनाची शांतता गमावून मिळवलेल्या त्या 'कौतुकाला' आज आरशासमोर उभे राहून तुम्ही किती गुण द्याल?"
जाता जाता :
स्वतःच्या सुखाचा ताबा दुसऱ्यांच्या हातात देणं आजच थांबवा. कारण तुमची शांतता ही कोणत्याही कौतुकापेक्षा कैक पटीने अधिक मौल्यवान आहे!
तुम्हाला ही लेखमालिका उपयोगी ठरत असेल तर ती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. व्हाट्सअप चैनल ची लिंक शेअर करून इतरांना स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन द्या.
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी
(ऑनलाइन कौन्सिलिंग सेशन्स घेतले जातात)
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
योग्य जागा
योग्य जागा
सेशनच्या डायरीतून,
फोनची मेसेज टोन वाजली आणि मी घड्याळाकडे पाहिलं.
आजचा क्लायंट — समीर, वय चौतीस, एका मोठ्या आयटी कंपनीत सिनिअर डेव्हलपर.
अपॉइंटमेंट घेताना "भेटण्याचं कारण" त्याने फक्त एक ओळ लिहिली होती: "मला वाटतं, मीच कमी पडतोय."
सेशन सुरू होताच तो समोर स्क्रीनवर दिसला.
शर्ट इस्त्रीचा कडक, पण खांदे झुकलेले.
खुर्चीवर बसताच म्हणाला, "मॅडम, सरळ सांगा, माझ्यात काय कमी आहे? सहा वर्षं जीव तोडून काम केलं. तरी प्रत्येक वेळी प्रमोशन दुसऱ्यालाच मिळतं."
पहिल्या पाच मिनिटांतच मला एक गोष्ट जाणवली. तो माझ्याकडे उत्तर मागत नव्हता. तर स्वतःला दोषी ठरवून एकदाचं मोकळं व्हायचं होतं त्याला.
“ तुझ्या पूर्ण दिवसाची सुरुवात ते शेवट कसा होतो ते सांग," मी म्हटलं.
तो सांगू लागला. रात्री अकरापर्यंत थांबून तो सगळी सिस्टिम सांभाळतो. गेल्या वर्षी एक प्रोजेक्ट त्याने वाचवला, पण क्लायंटसमोरच्या सादरीकरणात श्रेय घेतलं त्याच्या मॅनेजरने.
मीटिंगमध्ये त्याने एखादी कल्पना मांडली तर कोणी ऐकत नाही; तीच कल्पना पंधरा मिनिटांनी दुसरं कोणी बोललं की सगळे "व्वा!" म्हणतात.
परवा मॅनेजर हसत म्हणाला, "समीर, तू टेक्निकली उत्तम आहेस रे, पण तू 'टीम प्लेअर' नाहीस."
"तेव्हा तुला काय वाटलं?"
"मला वाटलं की... बहुतेक तो बरोबरच आहे."
तो खिन्नपणे हसला. "आजकाल रात्री झोप लागत नाही. आरशात पाहिलं की वाटतं, मी कुठल्याच कामाचा नाही."
मी त्याचा एक शब्द मनात नोंदवला: "बहुतेक." आत्मविश्वास कसा कमी होत जातो ते त्या एका शब्दात होतं.
रोज एकच आरसा समोर धरला की माणूस तेच प्रतिबिंब खरं मानायला लागतो. आरसा खराब असू शकतो, हा विचारच तो विसरून गेला होता.
माझ्या खिडकीत दोन कुंड्या होत्या.
एकीत मनी प्लांट, हिरवागार, पसरलेला. दुसरीत गुलाब, पानं पिवळी, एकही कळी नाही.
"समीर, त्या दोन कुंड्यांकडे बघ. काय दिसतं?"
तो गोंधळला. "मनी प्लांट मस्त आहे. पण गुलाब... जवळपास गेलेलाच दिसतोय."
"असंच मलाही वाटत होतं," मी म्हणाले. "दोन वर्षं मी त्याला खत दिलं, रोज पाणी दिलं, त्याच्याशी बोलले सुद्धा. काही उपयोग नाही. शेवटी मला वाटलं, गुलाबाला वाचवणं माझ्या हातात नाही."
त्यानंतर मी फोन काढला आणि त्याला एक फोटो दाखवला: गच्चीवर उन्हात डोलणारा, लालभडक कळ्यांनी लगडलेला गुलाब.
"हा तोच आहे. एका रविवारी चिडून मी त्याला खिडकीतून उचलून गच्चीत ठेवलं. आठ दिवसांत पालवी फुटली. आज तो गच्चीतच असतो. ही खिडकीतली कुंडी मी मुद्दाम ठेवलीय, तुझ्यासारख्यांना दाखवायला."
तो फोटोकडे बघतच राहिला. "म्हणजे गुलाबात दोष नव्हता..."
"अहं गुलाब कमजोर नव्हता. त्याची जागा चुकीची होती."
खोलीत काही क्षण शांतता पसरली.
मग मी त्याला समजेल अशा भाषेत सांगितलं. प्रत्येक माणसात वाढण्याची, फुलण्याची एक नैसर्गिक ओढ असते, पण त्यासाठी योग्य वातावरण लागतं.
माणसाला फुलायला तीन गोष्टी हव्या असतात:
✓स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य,
✓आपण सक्षम आहोत ही जाणीव आणि ✓कुठेतरी आपण 'आपले' आहोत ही भावना.
जिथे या तिन्हीचा अभाव असतो, तिथे कितीही हुशार माणूस असला तरी कोमेजतोच.
"पण मॅडम," तो म्हणाला, "हे सगळं सोपं वाटतं. कदाचित मॅनेजर बरोबर असेल तर?"
हा प्रश्न मला आवडला. कारण हाच प्रामाणिक प्रश्न होता.
"म्हणूनच आपण पुरावे गोळा करू," मी म्हटलं. "भावनेवर नाही, पुराव्यांवर निर्णय घ्यायचा. मी तुला तीन प्रश्न देते. पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांची उत्तरं लिही.
१. मी कुठे असताना वेळ कसा गेला कळत नाही?
२. माझं म्हणणं कुठे न मागताच ऐकलं जातं? ३. कुठल्या कामानंतर मी थकतो, पण रिकामा झाल्यासारखा वाटत नाही?"
पुढच्या आठवड्यात समीरने तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवली.
पहिल्या पानावर एक जुनी आठवण होती. कॉलेजमध्ये असताना त्याने एका ग्रामीण शाळेसाठी मोफत ॲप बनवलं होतं, मुलांच्या आरोग्याच्या नोंदींसाठी.
मुख्याध्यापिका फोनवर रडल्या होत्या, "तुझ्यामुळे आमच्या मुलांचा ताप वेळेवर पकडला गेला." हे सांगताना त्याचे डोळे चमकले.
मी गेल्या महिन्याभरात पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर उत्साह पाहिला.
"पाहिलंस?" मी म्हटलं. "तू कमी पडत नव्हतास. तू चुकीच्या मोजपट्टीने मोजला जात होतास. तिथे 'टीम प्लेअर' असणं म्हणजे श्रेय सोडून देणं असा अर्थ होता."
आम्ही पुढचे दोन महिने काम केलं. मी त्याला राजीनामा द्यायला सांगितला नाही. राजीनामा हा निर्णय नसतो, ती फक्त एक दिशा असते. आधी आम्ही त्याच्या आत्मसन्मान जागवण्याच्या दिशेने काम केलं. झोपेच्या सवयी ठीक केल्या, 'मी निरुपयोगी आहे' या विचाराला पुराव्यांनिशी आव्हान दिलं.
मग त्याने नेटवर्किंग सुरू केलं, जुने सहकारी भेटले, आपलं काम मांडायला शिकला.
तीन महिन्यानंतर समीरने पुन्हा एकदा समुपदेशनासाठी अपॉइंटमेंट घेतली.
सेशन जॉईन केल्यानंतर बघितलं हातात छोटी कुंडी, आत एक गुलाबाचं रोप.
"नव्या कंपनीकडून पहिला पगार आला," तो हसत म्हणाला. "हेल्थ-टेक स्टार्टअप आहे. ग्रामीण दवाखान्यांसाठी सिस्टिम बनवतोय. पहिल्याच आठवड्यात सीईओने माझी कल्पना ऐकून घेतली आणि म्हणाले, 'हे तुझं आहे, तूच कर.' मॅडम, मी रात्री अजूनही उशिरापर्यंत काम करतो, पण आता झोप शांत लागते."
"हे रोप खिडकीसाठी नाही हं," तो डोळे मिचकावत म्हणाला. "गच्चीसाठी."
त्याचं सेशन संपल्यानंतर मी बराच वेळ खिडकीतल्या त्या पिवळ्या गुलाबाकडे पाहत बसले. मीही एकेकाळी एका चुकीच्या खिडकीत सहा वर्षं कोमेजत राहिले होते, आणि 'दोष माझाच आहे' असं मानत राहिले होते. कधी कधी माणसाला स्वतःवर विश्वास ठेवायला कुणीतरी योग्य रस्ता दाखवावा लागतो.
तात्पर्य -
कधी कधी तुमची किंमत कमी नसते; तुम्ही चुकीच्या जागी असता. योग्य मोजपट्टी आणि योग्य वातावरण मिळालं की तीच माणसं बहरतात.
म्हणून स्वतःला दोष देण्याआधी स्वतःला प्रश्न विचारा:
👉 मी कमी आहे की माझी जागा चुकीची आहे?
🧡आणि जागा बदलण्याआधी पुरावे गोळा करा, घाईत नाही, विचारपूर्वक.
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६
मी नाही म्हणाले तर? भाग 6
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६
मी नाही म्हणाले तर? भाग 5
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
मी नाही म्हणाले तर!? भाग 4
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६
मी नाही म्हणाले तर? भाग 3
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६
मी नाही म्हणाले तर? भाग 2
सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६
मी नाही म्हणाले तर ? भाग 1 - गौरी हर्षल
बुधवार, २२ जुलै, २०२६
प्रत्येक गोष्टीवर बोलायलाच हवं का?
मंगळवार, १४ जुलै, २०२६
स्टेटस ठेऊ की स्टोरी?
शनिवार, ११ जुलै, २०२६
चौकटीत बसण्याचा अट्टहास
शुक्रवार, १० जुलै, २०२६
इतरांचे विचार आणि तुमचे अस्तित्व...
बुधवार, ८ जुलै, २०२६
गरज संपली की आदर ही संपला?
तुमच्या बाबतीतही असं होतं का? 🤔
गरज संपली की आदर संपतो?
मग लक्षात घ्या की तो आदर नव्हताच...
कालच्या आपल्या संवादानंतर आज मला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर तुमच्याशी बोलावंसं वाटलं. बऱ्याचदा समुपदेशन करताना अशी अनेक माणसं माझ्यासमोर येतात, जी एका वेगळ्याच मानसिक त्रासातून जात असतात. त्यांचा त्रास असतो— "मॅडम, मी समोरच्यासाठी एवढं सगळं केलं, पण आज मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाहीये, तर त्यांचं माझ्याशी वागणं पूर्ण बदललंय."
तुम्हीही कधी हा अनुभव घेतला आहे का? चला, आज यामागचं मानसशास्त्र समजून घेऊया.
१. उपयोगिता की तुमचं मूल्य? (Utility vs. Worth)
आपल्या समाजात बऱ्याचदा एका गोष्टीची गल्लत केली जाते: तुमची उपयुक्तता (Usefulness) म्हणजेच तुमचं मूल्य (Value) मानलं जातं. पण खरं सांगू? तुमची खरी किंमत यावरून ठरत नाही की तुम्ही कोणाच्या किती उपयोगाचे आहात. सायकॉलॉजिस्ट म्हणून मी म्हणेन:
💰🪙 तुमचं खरं मूल्य तेव्हा कळतं, जेव्हा तुमच्याकडे समोरच्याला देण्यासारखं काहीही उरलेलं नसतं— ना पैसा, ना वेळ, ना कोणती मदत. अशा परिस्थितीतही ती व्यक्ती तुम्हाला कशी वागवते, यावरून त्या नात्याची सत्यता कळते.
२. आदर आणि सोय यातील फरक (Respect vs. Convenience)
जर तुम्ही समोरच्याचं आयुष्य सोपं करणं थांबवलं आणि त्याच क्षणी त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर, प्रेम गायब झालं... तर तो कधी आदर नव्हताच. ती फक्त त्यांची 'सोय' (Convenience) होती.
🫠सोय पाहणारी माणसं: तुम्ही त्यांच्या हो ला हो म्हणताय, त्यांची कामं करताय तोपर्यंत तुम्ही खूप छान आहात. पण तुम्ही जिथे स्वतःच्या मर्यादा स्पष्ट केल्या किंवा 'नाही' म्हणालात, तिथे तुम्ही वाईट ठरता.
🙏 आदर करणारी माणसं: त्यांना तुमच्याकडून काही नको असतं. तुम्ही जसे आहात, तुमच्या गुणांसह आणि मर्यादांसह, ते तुमचा स्वीकार करतात.
३. हा फरक समजून घेणं का गरजेचं आहे?
जेव्हा आपण 'सोयीच्या नात्यांना' 'आपली माणसं' समजतो, तेव्हा आपण स्वतःलाच मानसिकदृष्ट्या थकावून टाकतो. आपण सतत स्वतःला सिद्ध करण्याचा, त्यांच्यासाठी झिजण्याचा प्रयत्न करतो. पण मानसशास्त्र सांगतं की, यामुळे तुमच्या आत्मसन्मानाला (Self-esteem) मोठी ठेच पोहोचू शकते.
आजचा विचार:
नात्यांमध्ये स्वतःला इतकंही रिकामं करू नका की तुमचं अस्तित्वच धोक्यात येईल. स्वतःला ओळखायला शिका. जे लोक तुमच्या असण्याचा आदर करतात, ते तुमच्या 'उपयोगाचे' असण्यावर कधीच प्रेम करत नाहीत.
हा फरक वेळेवर ओळखा आणि स्वतःला मानसिक त्रासापासून वाचवा.
✍️ स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
8.7.2026
गौरी हर्षल कुलकर्णी
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन )
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
मंगळवार, ७ जुलै, २०२६
what are you choosing?
रविवार, ३ मे, २०२६
दस साल बाद
शनिवार, १८ एप्रिल, २०२६
वड्याचे तेल वांग्यावर कशासाठी?
बुधवार, १५ एप्रिल, २०२६
पुन्हा पुन्हा तेच ते?
मंगळवार, ७ एप्रिल, २०२६
जो थांबला तो संपला
-
#तेच_तेच_अडथळे? विचारांचे चक्र आणि बदल कधी कधी आपल्याला वाटतं की नशीबच खराब आहे. सगळीकडे सतत तेच तेच अडथळे, तीच ती "बॅड लक" ची माल...
-
The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला ती मा...
-
#Quote_of_the_day9 रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजे...
Contact form |
Tags |